Saturday, July 1, 2017

जीएसटीची तोंडओळख

जीएसटी, अर्थात गुड्स ऍंड सर्व्हिसेस टॅक्स हा शब्द सध्या सर्वत्र लोकांच्या ओठी दिसतोय. लोकांना ह्या नवीन करप्रणालीबद्दल अगणित प्रश्न आहेत, आणि सर्वत्र बर्‍याच मुद्द्यांवर संभ्रमही दिसून येत आहे. माझ्या काही मित्रांच्या थेट आणि ’प्रेमळ’ विनंतीला मान देऊन (“शिरवळकर, तुला डोकं खाजवायचीही फुरसत नसली, तर आम्ही डोकं खाजवून देऊ, पण तू ह्यावर लिही!”) ह्या लेखाचा घाट घातलाय. ह्या लेखामधून आपण जीएसटीबद्दलच्या काही मुलभूत गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करू.

“वन नेशन वन टॅक्स”, खरंच?

जीएसटीचा प्रचार “वन नेशन वन टॅक्स” असा केला जातोय. ह्या एका वाक्यामधून अनेक लोकांना अनेक अर्थ लागत आहेत. ’वन टॅक्स’ म्हणजे हा एकच कायदा आहे? तर नाही. जीएसटीची चार अंग आहेत, CGST, SGST, UTGST आणि IGST. ह्या चार अंगांसाठी वेगवेगळे कायदे असणार आहेत. एक CGST Act, एक IGST Act, आणि प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी वेगवेगळ्या SGST Acts. थोडक्यात एक टॅक्स असला, तरी हा एक कायदा नव्हे. एकूण अडतीस वेगवेगळे मुख्य कायदे फक्त जीएसटीच्या नियमनासाठी असतील. जीएसटीमुळे राज्यांना जी केंद्राकडून भरपाई द्यावी लागेल, त्याबद्दलचा आणि इतर बाबींबद्दलचे कायदे वेगळे.

आता इतके कायदे असल्यावर त्याला वन टॅक्स का बरं म्हणावं? तर त्याचं उत्तर सोपं आहे. हे कायदे जरी अनेक असले, तरी त्या कायद्यांमध्ये कराचं गणित कसं करावं याबद्दलचे तंत्र हे एकच आहे. 
एकाच मूळ किंमतीवर CGST, SGST,UTGST आणि IGST काढले जातील. ह्यासाठी ठेवावे लागणारे हिशोब, रेकॉर्ड्स हे ही एक असतील. वेगवेगळ्या कायद्यांसाठी ते वेगवेगळे ठेवावे लागणार नाहीत. आपल्याला ग्राहक म्हणून मिळणार्‍या बिलांवर ह्या सर्व अंगांचा वेगवेगळा उल्लेख निश्चितच केला जाईल, पण हे कर वेगवेगळे नव्हेत, एका कराची वेगवेगळी अंग आहेत. जशी इन्कम टॅक्सची Income from Salary, Income from House Property, Capital Gains, Profits / Gains from Business वगैरे वेगवेगळी अंगं आहेत, तशीच. जशी ती आपण आपल्या रिटर्न / करविवरणपत्रात वेगवेगळी दाखवतो, तसंच CGST, SGST/UTGST, किंवा IGST हे बिलांवर वेगवेगळे दाखवले जातील. आता ही अंगं नेमकी काय आणि कशी आहेत ते जाणून घेऊ.

Image result for gst cgst
जीएसटीचे स्वरूप. सौजन्य: Quora


चार जिस्म, एक जान!

जेव्हा विक्रेता आणि ग्राहक वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतात, किंवा असं म्हणू, की कागदोपत्री वेगवेगळ्या राज्यांमधले असतात, तेव्हा IGST हे एकच कराचे अंग लागू होते. समजा १८ टक्के कर असेल, तर उपरोल्लेखित बाबतीत १०० रुपयाच्या गोष्टीवर १८ रुपये पूर्ण IGST लागेल. हा कर सर्वच्या सर्व केंद्र सरकारकडे जमा करावा लागेल. ह्या रकमेतून केंद्र आणि राज्यं त्यांच्या ठरलेल्या हिशोबानुसार करविभागणी करतील. थोडक्यात एकूण किंमत होईल ११८ रुपये.

जेव्हा विक्रेता आणि ग्राहक एकाच राज्यात असतील, तेव्हा अश्या व्यवहारांमध्ये CGST किंवा Central GST, आणि त्या राज्याचा SGST, अशी कराची दोन अंग लागू होतील. CGST हा केंद्र सरकारने लावलेला कर होय. वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या राज्यात व्यवहार होत असेल, त्या राज्याने लावलेला SGST ही लागू होईल. उपरोल्लेखित बाबतीत १०० रुपयाच्या गोष्टीवर ९ रुपये CGST आणि ९ रुपये SGST लागेल. महिन्याअखेरीस CGST हा केंद्राकडे, आणि SGST हा त्या राज्य सरकारकडे वेगवेगळ्या चलनांमार्फत जमा करावा लागेल. थोडक्यात एकूण किंमत होईल ११८ रुपये.

जर विक्रेता आणि ग्राहक एका केंद्रशासित प्रदेशात असतील, तर CGST आणि त्या केंद्रशासित प्रदेशाचा UTGST, आपल्या उदाहरणानुसार ९%-९% असे प्रत्येकी ९ रुपये प्रमाणे केंद्र सरकारकडे वेगवेगळे जमा करावे लागतील. इथेही थोडक्यात एकूण किंमत होईल ११८ रुपये.

जीएसटी हा खूप मोठा विषय आहे, आणि सगळेच (मीही) याबद्दल नवनवीन गोष्टी रोज शिकत असतात. 

दर्या में खसखस!

जीएसटीची तोंडओळख होण्याइथपत माहिती ह्या लेखात मी दिलेली आहे. बरेच इतर प्रश्न, इतर बाबींवर माहिती देण्यासाठी बरेच वेगवेगळे लेख लिहावे लागतील. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांबद्दल अवश्य कळवा. तूर्तास इतकेच!